पिंपरी-चिंचवड दि २७ :- नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दादागिरी, शिवीगाळ केल्याचा आरोप करत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्सनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेत आपले काम सुरु केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. डॉक्टरांना अधिकची सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच संबंधित नगरसेवकाविरोधात एफआर देण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. कोविड बाधित महिलेवर व्यवस्थित उपचार केले नाहीत.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली होती. तसेच त्यांच्यात वादावादी झाली होती.
नगरसेवक वाघेरे यांनी शिवीगाळ, अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करत वायसीएमच्या डॉक्टरांनी आज सकाळी कामबंद आंदोलन केले होते. तर, वाघेरे यांनी आपण शिविगाळ केली नाही. केवळ जाब विचारल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.
त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप, पालिकेतील पदाधिका-यांनी वायसीएमला भेट दिली होती. सायंकाळी पुण्यातील बैठक आटोपून आल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनीही वायसीएमला भेट दिली. डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आयुक्तांच्या आवाहानाला प्रतिसाद देत डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.