पुणे: दि २६ : – आज आपण सर्वजण “पुरावा आधारित” औषधाच्या युगात जगत आहोत. आज, वैद्यकीय क्षेत्रात, निदान करणे अपरिहार्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसह वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आरोग्य सेवा पुरविण्यामध्ये क्रांती घडली आहे, असे विधान डॉ. हर्ष महाजन, अध्यक्ष नॅटहेल्थ (हेल्थकेअर फेडरेशन ऑफ इंडिया), नवी दिल्ली यांनी केले. हे प्रगत तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या महागडे आहे परंतु याची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात हे तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध होऊ शकेल असे डॉ. महाजन यांनी पुढे बोलताना सांगितले. “सिमहेल्थ २०२१” या सिंबायोसिस स्कूल फॉर ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (एसएसओडीएल), सिंबायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) तर्फे आयोजित दोन दिवसीय परिषदेसाठी डॉ. हर्ष महाजन यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
“सिमहेल्थ” ही सिंबायोसिस तर्फे आयोजित वार्षिक परिषद आहे, ज्यामध्ये दरवर्षी आरोग्य क्षेत्राच्या सर्व विभागांमधून तसेच उद्योग, शैक्षणिक संस्था, नागरी संस्थां, संशोधक आणि धोरणकर्ते आदी सुमारें तीन हजार प्रतिनिधी सहभागी होतात.
डॉ. देवी शेट्टी, अध्यक्ष, नारायण हृदयालय लिमिटेड यांना “सिमहेल्थ २०२१” च्या समारोप समारंभासाठी विशेष अतिथी म्ह्णून आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सिंबायोसिस च्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यान मालेचा एक भाग होता.
डॉ.देवी शेट्टी यांनी पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि सध्याच्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तथापि, त्यांनी नजीकच्याकाळात येणाऱ्या कोविड च्या तिसऱ्या लाटेबद्दल जागरूक देखील केले. नजीकच्याकाळात आपल्याला डॉक्टर्स, नर्सेस आणि आयसीयू बेड्सचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. येत्या काही आठवड्यात आपल्याला सुमारे दिड लाख डॉक्टर्स, दोन लाख नर्सेस ची आवश्यकता भासणार आहे. केवळ डॉक्टर्स आणि नर्सेस रूग्णांना बरे करण्यास पुरेसे नसून कोविड रुग्णांवर पुढील काही आठवड्यांमध्ये उपचार करण्यासाठी आपल्याला पाच लाख अतिरिक्त आयसीयू बेड्स ची देखील आवश्यकता असणार आहे असे डॉ. शेट्टी पुढे बोलताना म्हणाले. भारत सोडून जगातील इतर कोणताही देश इतक्या मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी तयार करू शकत नाही असे डॉ. शेट्टी यांनी भाषणादरम्यान बोलताना सांगितले.
डॉ. शेट्टी यांनी पुढे नमूद केले की, कोविड आयसीयूमध्ये तरुण डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी काम करण्याची गरज आहे. त्यांचे लसीकरण केले गेले पाहिजे. पहिल्या लाटेच्यावेळी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी प्रचंड काम केलेले आहे आणि म्हणूनच आता दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपल्याला समांतर वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याची नितांत गरज आहे.
डॉ. शां ब. मुजुमदार, सिंबायोसिस चे संस्थापक व अध्यक्ष आणि कुलपती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र- कुलपती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. रजनी गुप्ते, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. राजीव येरवडेकर, अधिष्ठाता, आरोग्य विज्ञानशाखा, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. अभय सराफ, संचालक, सिंबायोसिस स्कूल फॉर ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (एसएसओडीएल) आदी “सिमहेल्थ २०२१” परिषदेसाठी इतर मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. नबीलाह काझी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुणे प्रतिनिधी :- भरत नांदखिले