पिंपरी – शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठीच आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ही प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे.
नो-एन्ट्रीतून वाहन चालविणाऱ्या चालकांवर खटला दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. प्रत्येक खटल्याकरिता १०० रुपये बक्षीसही जाहीर केले असून, शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठीच आयुक्तांनी ही प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे. गुरुवारी ऑटोक्लस्टरच्या सभागृहात शहरातील गुन्हे शाखेसह १५ पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीत बक्षीस योजना जाहीर करण्यात आली. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी चौकीतील पोलिसांना चौकात आणले. ठिकठिकाणच्या चौकांत पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरवात केली. या पोलिसांना कारवाईसाठी आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी आता बक्षीस योजना लागू केली आहे. नो एन्ट्रीतून येणाऱ्या वाहनचालकांवर भारतीय दंड विधान कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल केल्यास प्रत्येक गुन्ह्यामागे शंभर रुपयांचे बक्षीस पोलिसाला दिले जाणार आहे. तसेच, चारचाकी वाहनचालकावर अशाच प्रकारची कारवाई केल्यास पाचशे रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. सर्वाधिक कारवाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्तांच्या हस्ते बक्षीसही दिले जाणार आहे.पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील अनेक भागांमध्ये वाहनचालक नो एन्ट्रीतून प्रवास करतात. यामुळे त्यांच्यासह अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो. हे संभाव्य अपघात टाळण्यासाठी, तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे.
सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी योजना खुली
वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे, असा समज काही पोलिस कर्मचाऱ्यांचा झाला आहे. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ही बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे.