कर्जत दि.१८ :-कर्जत तालुक्यातील राशीन, परीटवाडी येथील एका बड्या सावकाराला बळजबरीने लाखो रुपयांची वसुली करणे खाजगी सावकारकी प्रकरण चांगलेच भोवले आहे.या सावकाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.नाना उर्फ बजरंग दौलत काळे (रा.परीटवाडी ता.कर्जत) असे या खाजगी सावकाराचे नाव आहे.
एक महिला (रा.राशीन) यांनी दि.७ जुलै रोजी कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती की, मी व माझा मुलगा महेश याने नाना उर्फ बजरंग दौलत काळे (रा.परीटवाडी ता.कर्जत) याच्याकडून २० मार्च २०१३ रोजी ५ लाख रुपये ५ रुपये टक्के व्याजदराने घेतले होते.त्यानंतर तीन वेळा वेगवेगळ्या वर्षी असे एकुण ७ लाख १० हजार रुपये घेतले होते.या सर्व रकमेचे तब्बल २२ लाख रुपये व्याजापोटी दिले.एवढी रक्कम देऊनही अजुन १० लाख ५० हजार रकमेची मागणी सावकाराने केली. मात्र जवळ पैसेच नसल्याने फिर्यादीने पैसे देणे बंद केले मात्र सावकाराने फिर्यादीचा मुलगा महेश याला मार्च २०१९ रोजी राशीन ग्रामपंचायत कार्यालयाकडून बसस्टँडकडे जात असताना अडवून शिवीगाळ व दमदाटी करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती.हा त्रास सहन न झाल्याने महेश याने आपल्या राहत्या घरी येऊन अंगावर केरोसीन (रॉकेल) ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतरही व्याजाच्या पैशांचा तगादा कमी होत नसल्याने फिर्यादीचा मुलगा महेश वर्षभर पुणे येथे भीतीपोटी निघून गेला होता.सावकार काळे हा फिर्यादीच्या घरी येऊन तुझा मुलगा कुठं गेला आहे?त्याचा मोबाईल नंबर सांग? असे म्हणत धक्काबुक्की व शिवीगाळ करत ‘माझे व्याजाचे पैसे दिले नाही तर बघून घेईन.’असा वारंवार दम देत होता.त्यानंतर काळे हा एवढ्यावर थांबला नाही.त्याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन मुलगा महेशला १० लाख ५० हजारांची मागणी करत मारून टाकण्याची धमकी दिली होती. सावकारकीचा कोणताही परवाना नसलेल्या या सावकारावर कर्जत पोलीस स्टेशन गु.र.न.४२७/२०२१ भा.द.वि.कलम ३४१,४५२,३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर आरोपी सावकार नाना काळे हा फरार होता त्याने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. कर्जत पोलिसांनी ताकद लावत त्याचा जामीन नामंजुर करून घेतला.कर्जत पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आले. तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आरोपीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळातच त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस अंमलदार तुळशीराम सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, सुनील शिंदे हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे