पुणे, दि.20:- वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्निंग लायसेन्स) मुदत ऑक्टोबर 2021 अखेर संपणाऱ्या उमेदवारांकरीता पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.पक्क्या अनुज्ञप्तीकरीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 21 व 22 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वाजता ऑनलाईन वेळ उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने वेळ आरक्षित (स्लॉट बुक) करुन शनिवार 23 आणि रविवार 24 ऑक्टोबर रोजी चाचणीसाठी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. येणाऱ्या उमेदवारांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.