पुणे दि,२२:- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होऊ एसी ई-बस पुण्यात २६ जानेवारीला बस सेवेत दाखल होतील, असा दावा ‘पीएमपी प्रशासना’ने केला आहे.
पाचशे एसी ई-बस भाडेकराराने आणि चारशे सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५० एसी बस घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या २५ आणि १२ मीटर लांबीच्या १२५ बसचा समावेश असणार आहेत. नऊ मीटर लांबीच्या बससाठी चीनच्या ‘बीवायडी’ कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पंचवीस बस जानेवारीअखेरपर्यंत ताफ्यात दाखल करण्याचे पीएमपी प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
पुणे शहरात भेकराई नगर डेपो चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशननुसार मार्ग ठरविले आहेत. त्यामध्ये भेकराईनगरहून पिंपळेगुरव, नरवीर तानाजी वाडी आणि पुणे स्टेशनसाठी, तर हडपसरहून हिंजवडीला बस सोडली जाणार आहे. या मार्गांचा समावेश आहे, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.