पुणे दि,२५ :- पाणीटंचाईमुळ पुणे शहरातील सर्व वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव, बांधकामे आणि सिमेंट रस्त्यांच्या कामासाठीच्या पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा तब्बल 20 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी यासाठी जलसंपदा विभागाकडून सातत्याने महापालिकेवर दबाव आणला जात आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने बांधकामांसाठी त्याचबरोबर महापालिकेचे; तसेच खासगी जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर यांसाठी होणार्या पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यांवर कारवाई करण्यासाठी गस्ती पथके नियुक्त केली जाणार आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो, हे लक्षात घेऊन सिमेंट रस्त्यांच्या कामाला लागणार्या पाण्याच्या वापरावरही पिण्याच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत पुणे शहरात.पाणीपुरवठा कपात करावी यासाठी जलसंपदा विभाग आग्रही आहे. याबाबत आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी फेब्रुवारी महिन्यात धरण्यातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊनच कपात करायचा की नाही, यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.