पुणे,दि.१३ :-शिक्रापूर वनपरिमंडळ कार्यालयातील अधिकाऱ्याने झाडे तोडण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून लाकडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन तो सोडण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना शिक्रापूर वनपरिमंडळ कार्यालयातील अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय-40) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पुण्यातील वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या युनिटने ही कारवाई गुरुवारी (दि.13) केली.
याबाबत ठेकेदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.व तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करतात. वनपरिमंडळ अधिकारी प्रविण क्षीरसागर यांनी तक्रारदार यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता. टेम्पो सोडण्यासाठी आणि पुन्हा कारवाई न करण्यासाठी क्षीरसागर यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, वनपरिमंडळ अधिकारी प्रविण क्षीरसागर यांनी तक्रारदार यांचा ताब्यात घेतलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि पुन्हा कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये स्विकारताना प्रविण क्षीरसागर यांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत साळुंखे करीत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.