पुणे,दि,१६:- तीन वर्षांपासून पाणीपट्टीची बिले थकलेल्या ग्राहकांना दहा टक्के सवलत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १७ मार्चला महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महालोकअदालतीमध्ये तीन वर्षांपासून पाणीपट्टीची बिले थकलेल्या ग्राहकांना दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे. पालिकेत स्थायी समितीमध्ये झालेल्या ठरावानुसार ही सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी शुक्रवारी दिली.
महालोकअदालतीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीची सुमारे चार हजार प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यातील थकीत पाणीपट्टी भरणाऱ्यांना सवलत देण्यात येणार आहे. मात्र, थकीत पाणीपट्टी तीन वर्षांपूर्वीची असणे गरजेचे आहे. थकीत पाणीपट्टीसंदर्भात नागरिकांनी पालिककडे संपर्क साधावा. ग्रामपंचायतीमधील पाणीपट्टीसंदर्भात नागरिकांनी संबंधित तालुक्यांच्या विधी सेवा प्राधिकरणांकडे संपर्क साधावा, असे सचिव सी. पी. भागवत यांनी सांगितले. लोकअदालतीसाठी नोटीस बजावण्यात आलेल्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही भागवत यांनी केले आहे.