पिंपरी चिंचवड,दि.११:- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झाले. मात्र या पालखीला काही किरकोळ घटना झाल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल करून राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले. आळंदी येथील घटनेसंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे.
काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या,
माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका.
गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही,
माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी.
वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे.
अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.