पुणे,दि.१६ :- पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋषीजी चौक) सुमारे 55 मीटर लांबीचा स्पॅन (गर्डर) टाकण्यात येणार आहे.
त्यामुळे चौकात उड्डाणपूलाचे खांब येणार नाही. त्यादृष्टीने या स्पॅन तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या “पुम्टा’च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर बॅरेकेडिंग करण्यास पीएमआरडीएला परवानगी देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिल्या. पुलाचे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून काम सुरू करावे, अशा सूचना पीएमआरडीएला दिल्या. व या कामाला मुर्हूत लागला. विद्यापीठ चौकात पुलाच्या कामासाठी चौक आणि रस्त्यालगत बॅरेकॅडिंग करून कामे सुरू करण्यात आले आहे.
गणेशखिंड रस्त्यावर जेथे पूल सुरू होतो, त्या ई-स्क्वेअर आणि बाणेरच्या दिशेने तिथे या ठिकाणी पूल उतणार आहे, तेथे पिलर्सचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. मुख्य चौकात काम उड्डाणपुलाचा खांब (पिलर्स) असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन पिलर्समध्ये 55 मीटरचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्या ठिकाणी लोखंडी गर्डरच्या स्पॅन टाकण्यात येणार आहे. मेट्रोच्या दोन पिलर्समधील अंतर हे 38 मीटरचे आहे. परंतु चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवण्यात येणार आहे. परिणामी, चौकात पिलर्स उभारण्याची गरज राहणार नाही.त्यामुळे 55 मीटर लांबीचा आणि सुमारे 18 ते 20 मीटर रुंदीचा हा स्पॅन असणार आहे. त्यावरून वाहतूक करणे सहज शक्य होणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विद्यापीठ चौकात पिलर्स न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दोन पिलर्समधील अंतर हे 55 मीटर लांब ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दुमजली उड्डाणपुलाची रचना करण्यात आली आहे.
– विवेक खरवडकर,महानगर नियोजनकार, पीएमआरडीए