पुणे,दि.१०:- पुणे शहरात काही दिवसांपासून मुलींच्या अत्याचाराच्या व त्यांंच्यावर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी दामिनी पथकांची संख्यादेखील वाढवली आहे व त्यासोबतच आता पुणे पोलिसांनी एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे.
या नंबरवर महिलांसंदर्भात सुरक्षेबाबत सूचना किंवा अभिप्राय मागवला आहे. नागरिकांच्या या सtचनांवर किंवा तक्रारींवर तातडीने कारवाईदेखील करण्यात येणार असल्यातं पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
‘हा’ आहे व्हॉट्सअॅप क्रमांक!
नागरिक 89759 53100 हा व्हॉट्सअॅप क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून त्याचा वापर करून आयुक्तांशी संपर्क साधू शकतात. आयुक्ताचं नागरिकांकडून अभिप्राय व सूचना गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये आयुक्तांनी म्हटले आहे की, “नमस्कार पुणेकरांनो..आपल्या मोबाईलमध्ये पोलीस आयुक्त 89759 53100 हा व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करा. तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी 112 डायल करा.
नागरिक व पोलिसांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. त्यासोबत प्रत्येक परिसरात संध्याकाळी दामिनीपथकाकडून पाहणी केली जात आहे. सोबतच रात्रीच्या वेळीदेखील पोलीस गस्त घालताना रस्त्यांवर दिसत आहे. पुणे पोलिसांच्य़ा या प्रयत्नांमुळे गुन्हेगारीला खरंच आळा बसणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दामिनी पथक रस्त्यावर…
यासोबत महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम करण्यात आले आहे. त्यात – पुणे महिला पोलिसांची 25 दामिनी पथके नव्याने निर्माण होणार. आतापर्यंत 15 दामिनी पथके होती. ती वाढून 40 होणार आहे. पेट्रोलिंगसाठी आणखीन 100 बीट मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत पेट्रोलिंग साठी 100 बीट मार्शल होते ते वाढून 200 होणार आहेत. पुणे पोलीस शहरातील महाविद्यालयांमधे समुपदेशन कार्यक्रम राबवणार आहेत तर पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी 24 तास सुरु राहणार आहेत.