पुणे,दि.०१ :- पुणे शहरातील विमाननगरमध्ये मॉल समोर झालेले अतिक्रमण आणि त्यातून वाढलेल्या गुंडगिरीला चाप लागावा यासाठी पुणे महानगरपालिकेने आज कारवाईचा बडगा उभारला खरा. परंतु कारवाई होणार याची माहिती आधीच ‘लीक’ झाल्याने यातील डझनभर बेकायदा स्टॉल रात्रीतूनच गायब करण्यात आले.
त्यामुळे कारवाईला ‘फुटीर’तेचे गालबोट लागले.
विमाननगरमधील आयटी कंपन्या, मॉल आणि उच्चभ्रू बाजारपेठेमुळे येथे व्यवसायिक जागेला सोन्याची किंमत मोजावी लागते. ही बाब लक्षात आल्यामुळे येथील एका मॉल समोर सुमारे पस्तीस स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यातील सुमारे पंचवीस स्टॉल्स बेकायदा होते. स्टॉल्सला लाखो रुपये भाडे मिळत असल्यामुळे आर्थिक वादातून येथे गुंडगिरी सुद्धा वाढली होती. तसेच अतिक्रमन विषयी परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी होत्या.
याची दखल घेत विमाननगरमध्ये कारवाईचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे गुप्त नियोजन नगर रस्ता अतिक्रमण विभागाने केले होते. मात्र येथील बेकायदा स्टॉल धारकांना याची खबर कालच लागली होती. ‘टीप’ पक्की असल्याने कारवाईतून वाचण्यासाठी मोठे क्रेन आणून यातील बहुतांशी स्टॉल्स रात्री उशिरा हलवण्यात आले.
कारवाई आधीच स्टॉल हलवल्यामुळे सीसीडी चौक मोकळा झाला. त्यानंतर आज दहा वाजता पुणे महानगरपालिकेने मॉल समोरील जागेवर शिल्लक बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली.
अतिक्रमण कारवाईची खबर ‘लिक’ झालीच कशी असा सवाल काही रहिवासी संघटनांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला. त्याची दखल घेत जबाबदार सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी लागलीच दिले.
आर्थिक लाभातून गुंडगिरी वाढली..
विमाननगरमध्ये स्टॉलचे लाखो रुपये भाडे मिळते. त्यातूनच गुंडगिरी वाढली असून एका व्यावसायिकाला धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी नुकतीच मोकाची कारवाई केली. तर काही दिवसांपूर्वी सीसीडी चौकातही पान स्टॉलच्या साहित्याची तोडफोड झाली होती. आजच्या कारवाई वेळीही दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
अतिक्रमण कारवाईची माहिती कशी ‘लीक’ झाली याची चौकशी करणार आहे. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त, नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालय.