पुणे,दि.०२ :- पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. गेल्या वर्षी ज्यांच्याकडे परवाना नाही किंवा जागेत बदल केला आहे, अशा मंडळांनी पुणे महापालिकेकडे परवाना घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
अशी आहे नियमावली
मागील वर्षापासून पुढील ५ वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, मंडपासाठी दिलेल्या परवानग्या ग्राह्य धरणार
ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे, २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल केला असेल, त्यांनी नवीन जागेवर सर्व परवानग्या घेणे आवश्यक
२०१९ च्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालय, पुणे शहर पोलिस ठाण्याकडून सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील
परवान्यांसाठी पुणे महापालिकेतर्फे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
सर्व गणेश मंडळांनी २०१९ च्या किंवा नव्याने घेतलेल्या परवान्यांची प्रत मंडप, कमानींच्या दर्शनी भागावर प्लास्टिक कोटिंगमध्ये लावावी
उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा नसावी, ४० फुटापेक्षा उंच मंडप असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे
मंडप, स्वागत कमानी उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका, प्रवासी बस जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत, कमानीची उंची १८ फुटांपेक्षा जास्त ठेवावी
आवश्यकतेनुसार स्वयंसेवक/सुरक्षारक्षक नेमावेत
शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्या
संस्था, संघटना, मंडळ, नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे
उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी तीन दिवसांच्या आत मंडप, देखावे, कमानी उतरवून घ्याव्यात, रस्त्यावरील साहित्य ताबडतोब हटवावे
रस्त्यावर खोदलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटने बुजवून टाकणे बंधनकारक
परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास परवाना उत्सव सुरू होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा महापालिकेला अधिकार
मंडप, कमानींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक
ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी
मूर्ती विक्रेत्यांसाठी जागानिश्चितीचा विसर
गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक असताना महापालिकेतर्फे अद्याप मूर्ती विक्रेत्यांसाठी अधिकृत ठिकाणांची निश्चिती झालेली नाही. परिणामी शहरात खासगी जागांसह पादचारी मार्ग, रस्त्यांवर मांडव टाकून मूर्ती विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून, वाहतूक कोंडीतही भर पडत आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागातर्फे समन्वयातून मूर्ती विक्रीसाठी महापालिकेच्या शाळा, मैदाने, मोकळ्या जागा भाड्याने दिल्या जातात.
त्यामुळे विक्रेत्यांना मोक्याच्या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी जागा मिळते. पण, यंदा अतिक्रमण निर्मूलन आणि मालमत्ता व्यवस्थापनाकडून जागा निश्चित झालेल्या नाहीत. विक्रेत्यांना महापालिकेच्या जागा मिळत नसल्याने त्यांनी पादचारी मार्ग, रस्त्यांवर मांडव टाकून मूर्ती विक्री सुरू केली आहे.
आयुक्तांनी जाहीर आवाहनामध्ये मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून हंगामी सोडत काढून व अटी-शर्ती टाकून जागा भाड्याने दिल्या जातील, असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मालमत्ता व्यवस्थापनाने अद्याप प्रक्रियाही सुरू केली नाही.
अतिक्रमण विभागाने ठिकाणांची यादी दिल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले. जागा वाटपाची प्रक्रिया मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केली जाते. यासंदर्भात त्या विभागाशी चर्चा केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
नागरिकांनो, येथे करा तक्रार
उत्सव कालावधीत नागरिकांना तक्रार करण्यासाठी खालील माध्यमांद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा पुणे महापालिकेने उपलब्ध केली आहे.
संकेतस्थळ : http://complaint.punecorporation.org
टोल फ्री क्रमांक : १८०० १०३ ०२२२, सर्व महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकावर.
मोबाईल ॲप : PUNE Connect (PMC Care)
व्हॉट्सॲप क्रमांक : ९६८९९००००२
मुख्य अतिक्रमण कार्यालय संपर्क क्रमांक : ०२०-२५५०१३९८
ई-मेल : feedback@punecorporation.org, encroachment१@punecorporation.org