पंढरपूर,दि.१६ :- नवीन लाईट मीटर देण्यासाठी व ७० हजार रुपये दंड झाल्याचे सांगून दंडाची रक्कम माफ करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन ५ हजार रुपये लाच घेताना पंढरपूर ग्रामीण २ च्या महावितरण कार्यालयातील सहाय्यक लेखापाल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. श्रीकांत भीमराव आवाड (वय -३८ रा. जुना विडीघरकुल, सोलापूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत २६ वर्षाच्या व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे तक्रार केली आहे. पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.१५) महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात केली. तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारचा दुकानातून लाईट कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ७० हजार रुपयांचा दंड आकारला आसल्याचे श्रीकांत आवाड यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच तो दंड माफ करण्याकरिता श्रीकांत आवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला पंधरा हजार रुपयाची मागणी केली.
तडजोडी अंती पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल केले. दरम्यान, तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळी करुन महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता श्रीकांत आवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे एसीबी अपर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पोलीस अंमलदार रियाज शेख, दिनेश माने, मंगेश कांबळे,
चालक दिवेकर यांच्या पथकाने केली.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
नितिन जाधव.
पोलीस उप अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
मोबाईल क्र. 9923046855
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल dyspacbpune@gmail.com
टोल फ्री क्र. 1064