पुणे,दि.१३:- पुण्यात काही शाळकरी मुलींना लक्ष करून त्यांच्या अंगावर स्प्रे मारला जात असल्याचा प्रकार पुण्यात आंबेगाव तालुक्यात समोर आला आहे. कोयता गँगनंतर आता या स्प्रे गँगचा धुमाकळ सुरू झाल्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी विद्यार्थिनींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावात एक आठवीत शिकणारी विद्यार्थीनी शाळेतुन घरी जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या टोळीने या विद्यार्थीनीच्या तोंडावर स्प्रे मारला. हा वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात येताच सोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने त्या अज्ञात दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा स्प्रे मारल्यानंतर विद्यार्थीनीच्या अंगाला खाज येऊन सूज आली आहे. दरम्यान याबाबत मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अशा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.