पुणे,दि.१४:-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाचा शुभारंभ येत्या रविवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 9.30 वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
बीएमसीसी रस्त्यावरील मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुल येथे हा कार्यक्रम होणार आहे. सोसायटीच्या नियमक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी विविध 57 घटक संस्थांच्या माध्यमातून 139 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशाला अनेक नामवंत विद्यार्थी दिले आहेत.