पुणे,दि.२७. :- पुणे महापालिकेने पुणे शहरात विविध ठिकाणी पुणे महापालिकेच्या जागांवर उभारण्यात येणार्या फटाका विक्री स्टॉलसाठी ऑनलाईन सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे महापालिका भवन येथील मुख्य कार्यालयासोबतच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तर ३० ऑक्टोबरला ऑनलाईन सोडत काढण्यात येईल, अशी माहीती अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. पुणे
महापालिकेच्यावतीने दिवाळीनिमित्त शहरातील विविध भागांमध्ये पुणे महापालिकेच्या जागेवर फटाका विक्रीसाठी स्टॉल उभारणीसाठी परवानगी देण्यात येते. या स्टॉलसाठी महापालिका प्रचलित दराने भाडे आकारते. फटाका विक्रीसाठी नारायण पेठेतील वर्तक उद्यानामागे नदीपात्रालगतच्या रस्त्याच्या कडेला सवाधीक ४० स्टॉल्स असतात. याठिकाणी प्रामुख्याने गेली अनेक वर्षे होलसेल व किरकोळ विक्री करणार्या फटाका विक्रेत्यांचे स्टॉल्स असतात. या जागेसाठी महापालिकेने मागील वर्षी ऑफलाईन अर्ज मागवून स्टॉल्सचा जाहीर लिलाव केला होता. त्यावेळी वाद झाले होते. हे वाद टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा प्रथमच ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईनच लिलावाची सुविधा केली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
ढाकणे यांनी सांगितले, की यावर्षी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन अर्ज देखिल स्वीकारण्यात येणार आहे. लिलाव ऑनलाईन करण्यात येणार असल्याने कोणालाही महापालिकेच्या कार्यालयांत यावे लागणार नाही. पैसे भरण्यासाठी ऑनलाईन गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कार्यालयांत जावून रोखीने देखिल पैसे भरण्याची सोय करण्यात येणार आहे. ऑनलाईन सुविधेचे यंदाचे पहिलेच वर्ष असून विक्रेत्यांच्या अडचणी समजावून घेउन यामध्ये पुढील वर्षी निश्चितपणे सुधारणा करण्यात येतील.
फटाका विक्रेत्यांना सर्व परवानग्या एकाच छताखाली
फटाका विक्रेत्यांना पोलिस, अग्निशामक दल तसेच महापालिकेच्या विभागाच्या सर्व परवानग्या एकाच छताखाली
देण्याची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये मोकळ्या जागांवर उभारल्या जाणार्या
स्टॉल्ससाठी अग्निशामक विभागाच्या स्वतंत्र परवान्याऐवजी सगळ्यांसाठी एकच परवाना देण्यात येणार आहे.
मात्र, सुरक्षिततेसाठी विक्रेत्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, ही अट कायम राहील.
विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.