अमरावती,दि.१४:- पुणे ग्रामीण पौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तीन आरोपी पळून अमरावतीत एका गुन्हेगाराच्याच घरी राहण्यासाठी आलेल्या अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक करून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला संतोष धुमाळ व त्याचे दोन साथीदार पुण्यातुन पळून अमरावती येथे आले असल्याची गोपनीय माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरून अमरावती शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट क्रमांक १ चे अधिकारी व कर्मचारी हे अमरावती शहरातील हॉटेल, लॉज तसेच आरोपीच्या शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. सागर खिराडे यांच्यासोबत तीन इसम असून ते त्याच्या चारचाकी वाहनात फिरत असल्याची माहिती मिळाली. व आशियाड कॉलनी चौकात सागर खिराडे हा त्याच्या गाडीत दिसून आला. मात्र, पोलिसांना पाहताच सागर खिराडे हा तेथून अंधाराचा फायदा घेऊन एका इसमासह पळून गेला व गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विपुल उत्तम माझिरे, वय 26 वर्ष, रा. रावडे ता. मुळशी पो. स्टे. पौंड, पुणे ग्रामीण आणि प्रदीप उर्फ पंकज धनवे, रा. सिंहगड रोड, दांडेकर पुल, 130 दत्तवाडी, पुणे तसेच सागर खिराडेसोबत पळून गेलेल्या इसमाचे नाव संतोष धुमाळ रा. मुळशी, पुणे असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ते अमरावती येथे मागील दोन दिवसापासून शेगाव परिसरात राहात असल्याचे व तेथे त्यांना अमरावती येथील गुन्हेगार सागर खिराडे यांच्या घरी राहत आल्याचे सांगितले. तसेच संतोष धुमाळ व विपुल माझिरे हे एमसीओसी प्रकरणातील आरोपी असून दोन ते तीन महिन्यापूर्वीच कारागृहातून सुटल्याचे सांगितले. सध्या पौंड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यातील अटक चुकविण्यासाठीच ते पुणे येथून पळून आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या आरोपींना पौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलिस उप निरीक्षक प्रकाश झोपाटे , पोलिस कर्मचारी राजूआप्पा, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, अमोल बाहदरपुरे, भूषण पद्मने, किशोर खेंगरे तसेच गाडगेनगर पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक माकोडे, कर्मचारी विनोद मालवे, संतोष चव्हाण, संदीप चव्हाण, नंदू धनवटे, बानूबाकोडे, दिनेश टवले, जाकीर यांनी केली.