पुणे,दि.०९:- महागाई पूर्णतः नियंत्रणात आणून जनतेला दिलासा देण्याचे वचन महाविकास आघाडीने दिले आहे. त्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धारही केला आहे, असे सांगून, जनतेने २० नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यासारख्या जबाबदार, पारदर्शक, कर्तव्यदक्ष व अनुभवी उमेदवारास मतदानावेळी ‘पंजा’ या चिन्हापुढील बटण दाबून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केले. दत्ता बहिरट यांच्या प्रचारार्थ आयोजित जीप यात्रेत ठिकठिकाणी नागरिकांशी त्या बोलत होत्या. या जीप यात्रेत त्यांच्यासोबत उमेदवार दत्ता बहिरट, अंकुश काकडे, दीप्ती चवधरी, श्रीकांत पाटील, माउली यादव, विशाल जाधव, मुकुंद किरदात, अॅनीदीदी, अन्वर शेख, अजित जाधव, राजू माने, राजेंद्र भुतडा यांसह असंख्य प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सुप्रियाताई यांनी महिला सुरक्षा, शेतकरी समस्या आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर स्पष्टपणे मत व्यक्त करून महिला सुरक्षेबाबत सरकारच्या धोरणांवर टीका केली. महिलांसाठी अधिक प्रभावी योजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठीचे कार्यक्रम टिकाऊ आणि खऱ्या अर्थाने स्त्री-शक्तीकरणासाठी असावेत, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार दत्ता बहिरट यांनी ‘जनता दरबार’ भरविण्याचा संकल्प करून या माध्यमातून नागरिकांनी आपल्या अडचणी मांडव्यात व त्यांचे तत्काळ निराकरण केले जाईल, असे सांगितले. खडकी भागातील पाणीपुरवठा, वाहतूक समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचे मुद्दे यातही मी प्राधान्याने लक्ष देणार व हे प्रश्न सोडवणार, असे ते म्हणाले.
आज सकाळी सुप्रियाताईंच्या जीप यात्रेची सुरुवात खडकी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून फटाक्यांच्या आतषबाजीत झाली. या जीप यात्रेत सुमारे एक हजारहून अधिक युवक व युवती दुचाकींसह सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ‘महाविकास आघाडी झिंदाबाद’, ‘दत्ता बहिरटांचा विजय असो’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रचार यात्रेप्रसंगी खडकीतील मातंग समाजातर्फे उमेदवार दत्ता बहिरट यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी खडकी कँटोन्मेंटचे माजी अध्यक्ष माउली यादव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथेच निवडणूक कचेरी सुरू करण्य़ात आली आहे. या प्रचार यात्रेत जागोजागी नागरिक उत्स्फूर्तपणे स्वागत करीत होते. मार्गावरील विविध मंदिरे, मशिदी, ईदगाह येथेही भेट देण्यात आली. बोपोडी येथील मशिदीत दत्ता बहिरट यांनी शुक्रवारच्या नमाजानिमित्त जमलेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ही जीप यात्रा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक (खडकी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोपी चौक, हुले रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी चौक, खडकी बस स्टॉप, टी. जे. कॉलेज रोड, छाजेड पेट्रोल पंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बोपोडी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त झाली.