.पुणे, दि. २३ :– सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2019 च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे रॅण्डमायझेशन करण्यात येणार आहे. दिनांक 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून भोसरी येथील वखार महामंडळाचे गोडावून येथे रॅण्डमायझेशनची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.
पुणे जिल्हयातील चारही लोकसभा मतदारसंघातील सी-व्हीजील, टपाली मतदान, ईव्हीएम मशीन हाताळणी, एक खिडकी योजना, खर्च व्यवस्थापन, पोलींग स्टेशन इ. सर्वच विषयांचे अधिकारी व कर्मचा-यांना वेगवेगळया टप्यांमध्ये आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निवडणुकीमधील उमेदवारांकडून करण्यात येणा-या खर्चाच्या तपासणीकरीता जिल्हा दर सूची अंतिम करण्यात आली आहे. या सूचीमधील साहित्याचे दर निश्चित करताना टेंडरच्या माध्यमातून तसेच मान्यताप्राप्त असोसिएशनच्या माध्यमातून दर निश्चित करण्यात आले होते. या दराबाबत बैठकीचे आयोजनाच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले होते. यावेळी काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यातील काही साहित्यांच्या दरांबाबत सुधारणा करण्याचे कळविले होते. यावर पडताळणी करुन जिल्हा दर सूची अंतिम करण्यात आली आहे. ही दर सूची नामनिर्देशनाच्या वेळी उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी सिंह यांनी सांगितले.