पुणे ०८ : – चिखली पोलीस ठाण्यात क्राइम ब्रांचचा पोलीस हवालदार असल्याचे सांगत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार आली असून गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीसाठी घेतलेला मोबाईल व प्रोजेक्टर परत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना तिघे जण अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले. मंगळवारी खराडी येथे अँटी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली. पकडलेल्यांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे.
दशरथ दत्तात्रय शिंदे (वय ३७ वर्षे, रा.एकलहरे ता. आंबेगाव जि. पुणे), अॅड. संतोष पोपट थोरात (वय ३२ वर्षे, धंदा वकील रा / एक लॉन सोसायटी खराडी पुणे), मंगेश उत्तम जिवडे (वय ४० वर्षे, रा. थिटे वस्ती खराडी पुणे) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत.
तक्रारदार यांना अॅड. संतोष थोरात याने तुमच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. तिचा तपास पोलीस उपनिरीक्षक आहिरे हे करीत आहेत. असे सांगितले. तर दशरथ शिंदे याने आपण क्राइम ब्रांचमध्ये पोलीस हवालदार असल्याचे सांगितले. तसेच या हे प्रकरण आपणच हाताळत आहोत. असे सांगितले. दरम्यान त्या तक्रारी वरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीसाठी तक्रारदाराक़डून आधीच ताब्यात घेतलेले मोबाईल व प्रोजेक्टर परत करण्यासाठी दशरथ शिंदे याने मंगेश जिवडे, आणि अॅड. संतोष थोरात यांच्या मदतीने तक्रारदाराला १ लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर ते तडजोडीअंती ३० हजार रुपये स्विकारण्यास तयार झाले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अँटी करप्शनकडे तक्रार केली. तेव्हा अँटी करप्शनच्या पथकाने पडताळणी केल्यावर त्यांनी १ लाखांची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने मंगळवारी खराडी येथील झिनस्टार IT पार्क येथील हॉटेल परमहंस समोर तिघांनाही ३० हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. तिघांनीही आपण पोलीस असल्याचे भासवून पैसे मागितले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपअधिक्षक प्रतीभा शेडगे, कर्मचारी श्रीकृष्ण कुंभार , कृष्णा कुऱ्हे , स्नेहा मस्के , राऊत थरकार , सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या पथकाने केली.
एखाद्या लोकसेवकाने लाच मागितल्यास त्यासंदर्भात अँटी करप्शनच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.