पुणे.दि ०२ :- ऑगस्ट महिन्याच्या पावसाळी वातावरणात एक महिना फुटबॉल, बास्केटबॉल आणि मॅरेथॉन अशा खेळाचा आनंद पुणे आणि परिसरातील खेळाडू घेऊ शकणार आहेत. निमित्त असेल 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सृजन सुपर कप 2019 स्पर्धेचे.फुटबॉल, बास्केटबॉल आणि मॅरेथॉन (रन फॉर कॉझ) अशा तीन खेळाच्या स्पर्धा या क्रीडा महोत्सवा अतंर्गत होणार आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेमधील दरी कमी करण्याचे काम ही स्पर्धा करणार आहे. या महोत्सवात साधारण दोन हजारहून अधिक मुले, मुली सहभागी होतील असा अंदाज आहे बारामती ऍग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांच्या पुढाकाराने “सृजन सुपर कप’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी टेनिस बॉल क्रिकेट, कबड्डी, बॉक्सिंग, स्क्वॉश अशा खेळांना सृजनने स्पर्धेचे एक नवे व्यासपीठ मिळवून दिले. या उपक्रमाबद्दल रोहित पवार म्हणाले,””खेळाला कसलीच सीमा नसते. कुणीही खेळू शकतो. तंदुरुस्त राहण्यासाठी म्हणा किंवा आपल्यातील अंगभूत क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी कुणीही मैदानावर उतरु शकतो. याच क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी त्याला स्पर्धेची जोड दिली आणि “सृजन कप’ स्पर्धेची निर्मिती झाली.” या महोत्सवातील फुटबॉल स्पर्धा एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानावर होईल. बॉस्केटबॉलचे सामने डेक्कन जिमखाना आणि “रन फॉर कॉझ’ नावाने ओळखली जाणारी मॅरेथॉन शर्यत पुणे पोलिस मैदानावरून सुरू होईल. धावण्याची स्पर्धा “नो बाऊंड्रीज’ या शिर्षकाखाली होईल. ही स्पर्धा खुल्या गटासाठी पुरुष आणि महिलांसाठी 10 कि. मी., 5 कि.मी., 3 कि.मी. अशा तीन अंतराची असेल. यातील 10 आणि 5 कि.मी. शर्यतीमधील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येईल. अन्य स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येईल. पुणे पोलिस मैदानावरून सुरवात झाल्यावर स्पर्धक शिवाजीनगर-ब्रेमन चौक आणि परत त्याच मार्गाने पोलिस मैदानावर येतील.
एक महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी “सेव्हन अ साईड’ फुटबॉल स्पर्धेचेही आजोयन करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी असणाऱ्या प्रवेश फीमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेतील आठ गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या खेळाडूंना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतच होणार आहे. सामजिक बांधिलकी जपण्याच्या या प्रयत्नांमुळे झोपडपट्टीमधील या मुलांना आपली ओळख मिळणार आहे. अशाच भागातील मुलांसाठी बास्केटबॉल या खेळाचे शिबिरही आयोजित केले जाणार आहे.
या सामाजिक बांधिलकी विषयी रोहित पवार म्हणाले,””खेळण्यासाठी आणि खेळ शिकण्यासाठी येणारे सर्व अडथळे दूर करून या मुलांमध्ये आत्मविश्वास जागवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सोयी सुविधा पुरवल्यानंतर आम्ही देखील स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे करू शकतो हाच विश्वास आम्हाला या मुलांच्यात निर्माण करायचा आहे.”
त्याचवेळी शहरातील क्लबसाठी खुल्या गटासाठी (पुरुष-महिला) देखील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. यात पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेशी संलग्न असणाऱ्या 64 संघांचा सहभाग असेल. शहरातील महाविद्यालयातील मुले आणि मुलींच्या संघांनाही या स्पर्धेत सहभागी होता येईल.
बास्केटबॉल स्पर्धा ही केवळ कॉलेज आणि शाळांसाठी असेल. पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या नियमाप्रमाणेच ही स्पर्धा होईल. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 8600020913/915 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आव्हान करण्यात आले आहे