पुणे दि ०५ :-पुणे शहरात गणेशोत्स देखावे पाहण्यासाठी भाविकांची होणारी दरवर्षी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने शुक्रवार दि ६ ते बुधवार दि.११ पर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. दररोज सायंकाळी पाच पासून ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीतील बदल कायम राहतील. भाविकांना अडथळा येऊ नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल केला आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.
वाहतुकीतील बदल कालावधी – ६ ते ११ सप्टेंबर २०१९ वेळ – सायंकाळी पाच पासून गर्दी संपेपर्यंत
लक्ष्मी रस्ता हमजेखान चौक ते टिळक चौक मार्ग बंद पर्यायी मार्ग ः डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दूधभट्टीवरून सरळ दारूवाला चौक, डावीकडे वळून अपोलो टॉकीज पाठीमागून मारणे रस्त्यावरून सिंचन भवन डावीकडे वळून, शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस चौक मनपा भवन पाठीमागील रस्त्याने इच्छित स्थळी जावे. हमजेखान चौक डावीकडे वळून-महाराणा प्रताप रोडने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकी, त्यानंतर पुढे शंकरशेठ रोडने जावे.
शिवाजी रस्ता गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक मार्ग बंद. पर्यायी मार्ग : शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच सिमला चौक, कामगार पुतळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौकातून नेहरू रस्त्याकडे जावे. कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबाजी चौकातून महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडी पेठ पोलिस चौकीच्या दिशेने जावे.
बाजीराव रस्ता पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक बंद (टेलिफोन भवन ते पूरम चौक या रस्त्यावरील एकेरी वाहतुकीत बदल करून दुहेरी वाहतूक करण्यात येणार.) पर्यायी मार्ग पूरम चौकातून टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रोडने अप्पा बळवंत चौक.
टिळक रस्ता मराठा चेंबर ते हिराबाग चौक ः (पीएमपीएल बस व तीन आसनी रिक्षा वगळता.) पर्यायी मार्ग जेधे चौक नेहरू स्टेडियमसमोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबाग.
बेलबाग चौक ते रामेश्वर चौक हा मार्ग पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद पर्यायी रस्ता ः स्वारगेटकडे जाणाऱ्या मिनी पीएमपीएल बस, इतर हलकी वाहने बेलबाग चौकातून सेवासदनमार्गे पुढे जातील. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएल बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौक, टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील. तर, शिवाजीनगरहून पुणे स्टेशन व हडपसरकडे जाणाऱ्या बस जिजामाता चौकातून डावीकडे वळून फडके हौदमार्गे पुढे जातील.