पुणे दि ०८ :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस दलाकडून महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनोखे ‘गिफ्ट’ रविवारपासून फरासखाना वाहतूक विभागाची कायमस्वरूपी जबाबदारी आता महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असणार आहे. वाहतुकीची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या फरासखाना वाहतूक विभागाचा संपूर्णपणे कारभार महिलांच्या हाती देण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी फरासखाना वाहतूक विभाग महिलांच्या हाती सोपविण्याची संकल्पना मांडली होती. व वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली आहे. व ”जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
संबंधित महिला अधिकारी व कर्मचारी अतिशय सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडतील. त्यांना गरजेनुसार सर्व प्रकराचे निर्णय घेण्याचा अधिकार असेल.” असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून फरासखाना वाहतूक विभाग ओळखला जातो. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह मोठी गणेशोत्सव मंडळे, कापड व सराफी बाजारपेठा यांसारखा महत्त्वाचा परिसर या विभागामध्ये येतो. त्यामुळे हा परिसर वर्षभर गर्दीने गजबजलेला असतो. सकाळी व सायंकाळी रहदारीच्यावेळी येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी, दहीहंडी यांसारख्या सण, उत्सवांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायस्वरूपी सुरू आहे. त्यादृष्टीने यापूर्वीच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही येथील वाहतूक सुरळीत ठेवून वाहतूक कोंडीची समस्या सोडविणे आव्हानात्मक ठरणार आहे. याबरोबरच बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्याचीही जबाबदारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.