पुणे दि २६ :- पुणे जिल्हयातील 43 वर्षे वय असलेल्या एका रुग्णावर नायडू रुग्णालयात सोळा दिवस उपचार सुरु होते. महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन पुण्यातील हा रुग्ण 16 दिवसांत बरा होऊन घरी गेला. “माझ्यासाठी डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळेच आणि परिचारकांच्या सेवेमुळे मी कोरोनाच्या महामारीतून बरा झालो,” असे त्याचे भावनिक उद्गार ऐकून डॉक्टरांना देवाची उपमा का देतात, याचा प्रत्यय आला.व्यवसायाने वाहनचालक असणाऱ्या या रुग्णाचा स्वत:चा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय होता. फिरती व्यवसाय असल्यामुळे मुंबई- पुणे असा नेहमीचाच प्रवास! एके दिवशी दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांना घेऊन तो पुण्याला परतला. हा प्रवास तीन ते चार तासांचा होता. या प्रवासात त्याचा परदेशातून आलेल्या प्रवाशांशी संपर्क आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णावर 16 दिवस वैद्यकीय उपचार करण्यात आले. पण ते घाबरुन जाऊ नयेत, म्हणून डॉक्टरांनी मानसिक बळ दिले.या रुग्णाचा शेवटचा तपासणी अहवाल 25 मार्च रोजी रात्री 10 वाजता मिळाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्याच्या घरी दोन मुले आणि पत्नी.. बरे झाल्यावर आज घरी सोडणार, ही बातमी समजताच हे ऐकून कुटुंबाला खूप आनंद झाल्याचे या रुग्णाने सांगितले. या रुग्णाला डॉक्टरांनी घरी गेल्यानंतर स्वच्छ हात धुणे, कोणाच्याही संपर्कात न येणे, तोंडाला नेहमी मास्क वापरणे या दक्षता घेण्यास सांगितले.व्यवसायाने वाहनचालक असणारा हा रुग्ण आध्यात्मिकही होता. यामुळे नायडू रुग्णालयात ॲडमीट केल्यापासून ते घरी सोडेपर्यंत हॉस्पिटलमध्ये वेळ घालविण्यासाठी नित्यनियमाने तो श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण करीत होता. डॉक्टरांनी घ्यावयास सांगितलेली सर्व खबरदारी ते कुटुंबिय घेत आहेत. तसेच घरीही आता दररोज सकाळी कोमट पाणी पिणे व नित्यनियमाने सकाळी एक तास व्यायाम, वेळच्यावेळी जेवण, करत असल्याचे ते सांगतात. तसेच सध्या त्याला लॉकडाऊनमुळे घरीच थांबावे लागत असल्याने घरी देखील वेळेचा सदुपयोग करत नित्य नियमाने सकाळी व संध्याकाळी दोन तास संत तुकाराम महारांजांच्या गाथेचे पारायण करत आहेत.जनतेला अनुभव सांगताना तो म्हणतो, या आजारातून बरे होण्यासाठी माझ्या आत्मविश्वासाबरोबरच कुटुंबाची मानसिक साथ मिळाली. नियमित व्यायामाने व वेळच्या वेळी संतुलित आहार घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते, तर डॉक्टरांच्या उपचाराने व आपल्या आत्मविश्वासाने कोरोना सारख्या महामारीतून निश्चितच बरे होता येते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.