सोलापूर, दि १२ :- सप्टेंबर : सोलापुर परिसरात एका जिगरबाज ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गॅसने भरलेला टॅंकरमध्ये चालकाला अचानक फीट आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. मात्र, ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संजय चौगुले यांना ट्रक ड्रायव्हरला काहीतरी झाले आहे व तो बेशुद्धावस्थेत गाडीत पडलेला दिसून आले व जीवाची पर्वा न करता यांनी चालता टॅंकरचा ताबा घेत वाहनावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
घडलेली हकीकत अशी की, सकाळचे 8.30 वाजले होते. मुंबई ते सोलापूर हे अंतर रातोरात पार करून गॅसने भरलेला टॅंकर सावळेश्वर टोल नाक्यावर आला.टोल भरून एका मागून एक, असे चार टॅंकर पाकणी डेपोच्या दिशेने निघाले. त्याठिकाणी पोहचल्यावर निवांत आराम करता येईल, या आशेने तीन टॅंकर पुढे गेले. मात्र, शेवटी असलेला टॅंकर नागमोडी वळणे घेत अंगावर येत असल्याची जाणीव तेथील ड्युटीवर असलेले महामार्ग पोलीस कर्मचारी संजय विठोबा चौगुले यांना झाली.चौगुले यांनी तत्काळ टॅंकरच्या दिशेने धाव घेतली आणि पाहिले तर काय, चालक उमेश पाटील (रा. खामकरवाडी, उस्मानाबाद) यांच्या हाती स्टेअरिंग नव्हतीच. त्यांनी कोणताही विचार न करता ते टॅंकरवर चढले. चालकाचा अॅक्सिलेटरवरील पाय काढून स्वत:चा पाय क्लच व ब्रेकवर ठेवला आणि टॅंकर जागेवरच थांबविला अन् पुढील मोठा अनर्थ टळला.मुंबईहून गॅसने भरलेले टॅंकर पाकणी येथील भारत गॅसच्या डेपोवर दररोज ये-जा करतात. नेहमीप्रमाणे मुंबईहून चार टॅंकर एका मागून एक सोलापुरच्या दिशेने येत होते. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील टोल पास करून तीन टॅंकर पुढे गेले. परंतु, एक टॅंकर मागे होता. टोल भरून तो टॅंकर बूथमधून पुढे पास झाला. मात्र, तो सरळ न येता नागमोडी पध्दतीने इकडे तिकडे असा येऊ लागला. टोलवरील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात यावी म्हणून त्याठिकाणी दररोज दोन शिफ्टमध्ये महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ पोलीस कारवाईसाठी उभे असतात. त्या दिवशीही सात पोलीस कर्मचारी आणि सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खरात ड्युटीवर हजर होते. त्यातील संजय चौगुले यांचे त्या टॅंकरकडे लक्ष गेले. टॅंकर तर पुढे येतोय, मात्र चालक दिसत नव्हता. हा थरार तीन ते पाच मिनिटे सुरूच होता. काही क्षणात गॅसने भरलेला टॅंकर टोल शेजारील कॅन्टीनच्या दिशेने जात होता. यावेळी असे का होत आहे, याची माहिती न घेता चौगुले टॅंकरच्या दिशेने धावले आणि टँकर थांबवला.वाहनांची लागलेली टोलवरील रांग, सकाळच्या सत्रात कॅन्टीनवर चहा, नाश्ता करायला थांबलेले लोक, अशा स्थितीत गॅसने भरलेला टॅंकर कॅन्टीनच्या दिशेने जात होता. टॅंकर चालकास फिट आल्याने तो बेशुद्ध पडला होता. तो टॅंकर थांबवून मोठा अनर्थ टाळून देवदूत ठरलेल्या संजय चौगुले यांचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं. तसंच महामार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे,व चौगुले यांच्या कार्याचे शुक्रवारी व शनिवारी दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.