पुणे दि १८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी ७० प्लाझ्मादानाची संकल्पना मांडून आवाहन केले होते. या उपक्रमाचा कोथरुड मध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाचा बुधवारी श्रीगणेशा झाला.
कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. मात्र, पुणे शहरासह सर्वत्र प्लाझ्माची मागणी वाढूनही, त्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातून ७० प्लाझ्मा दात्यांकडून प्लाझ्मा दान उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती.
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवारपासून पुणा सेरोलाॅजिकल इन्सिट्यूट ब्लड बँक येथे प्लाझ्मादान शिबीर राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड कार्यालयाचे व्यवस्थापक राहुल देशपांडे, कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, अजय मारणे यांच्यासह अनेकांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान करुन या उपक्रमाचा श्री गणेशा केला. तर अनेकजणांनी प्लाझ्मादान करण्यासाठीची इच्छा व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ मिळत असून, बुधवारी प्लाझ्मा दान उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर पुणा सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूटकडे प्लाझ्माच्या मागणी सुरु झाली आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी म्हणून प्लाझ्मादात्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावा असे आवाहन आ. श्री. पाटील यांनी केले.