पुणे दि २९ :- वेबसिरीज आजच्या काळात एखादा विषय अत्यंत उत्तम पद्धती ने मांडण्यासाठीचे अतिशय उत्तम आणि ताकदीचे माध्यम आहे. आणि विषय जेव्हा तितकाच गंभीर, हळवा, प्रभावशाली आणि डोळ्यात अंजन घालणारा असतो तेव्हा तर हे माध्यम आणखीनच प्रभावी ठरते.असाच एक दमदार विषय घेऊन द गोल्डन शेकहॅण्ड प्रॉडक्शन प्रस्तुत व कर्टन रेझर एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने प्रा.रमेश कुबल यांच्या “कुणाच्या खांद्यावर” या मराठी नाटकावर आधारित ‘सताड उघड्या डोळ्यांनी’ ही वेबसिरीज ही येत्या १ जुलैपासून द चॅनल वन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे.ही सिरीज पाच भागांची असून स्वातंत्र्यपूर्व काळातील आजोबा आणि त्यांचे संस्कार व तत्वे घेऊन वाढलेला आताच्या काळातील नातू आणि या दोघं मध्ये गुंतलेली आजी यांच्या नात्यावर व आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे.या वेबसिरीज बद्दल बोलताना त्याचे दिग्दर्शक प्रशांत गिरकर म्हणाले की, जवळपास चौदा वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मला कमबॅक करायचे होते तेव्हा तितक्याच ताकदीने करायचे होते. साधारण वीस एक वर्षांपूर्वी हे नाटक मी करणार होतो आणि त्यात प्रभाकर पणशीकर काम करणार होते. पण काही कारणांनी ते होऊ शकले नाही. मात्र आता पुन्हा जेव्हा वेबसिरीज करायची ठरली तेव्हा मात्र हाच विषय घेऊन करायची हे पक्क होतं. यासाठी मला तितकीच मोलाची साथ मिळाली ती विक्रम गोखले सरांची. विक्रम गोखले म्हणजे साक्षात अभिनयाचे विद्यापीठ. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मला सर्वार्थाने समृद्ध करणारा होता.यामध्ये विक्रम गोखले, अथर्व कर्वे, अभिनेत्री नीता दोंदे महेश पाटील आणि आर जे केदार जोशी हे प्रमुख भूमिकेत आहेत.या वेबसिरीजचे निर्माता सार्थक पवार तर सहनिर्माते नमिता वागळे गिरकर आणि कुमार मगरे आहेत. मूळ नाटक व संवाद हे प्रा. रमेश कुबल यांचे असून त्याचे मालिका रूपांतर संजय डोळे यांनी केले आहे. करण तांदळे यांनी छायाचित्रण केले असून ध्वनी स्वरूप जोशी व संगीत दिग्विजय जोशी यांचे आहे. कलादिग्दर्शक म्हणून वैभव शिरोळकर यांनी काम पाहिले तर प्रसाद कुलकर्णी कार्यकारी निर्माता आहेत .