कर्जत दि १६ : -कर्जत तालुक्यातील धालवडी येथील व्यावसायिक प्रमोद पोपट चव्हाण यांच्या मालकीचे प्रगती मोबाईल शॉपी दुकान आहे. प्रगती मोबाईल शॉपी या त्यांच्या मालकीच्या दुकानात ११ जुलै रोजी चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर उचकावून अनधिकृतपणे आत प्रवेश केला होता. दुकानात विक्रीसाठी ठेवलेले ५ लाख २० हजार रुपये किंमतीचे २६ स्मार्टफोन चोरीस गेले होते.या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मोबाईल शॉपी फोडीच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी हे बीड तसेच बेनवडी,ता.कर्जत आणि करमाळा येथील आरोपींनी केली आहे आणि आता ते आरोपी चीलवडी गावचे शिवारात वीटभट्टीवर काम करत आहेत.अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित इसम पप्पू सर्जेराव गायकवाड, वय २५ वर्ष, रा.धामणगाव, ता.आष्टी, जि. बीड, सुरज बाळु गायकवाड, वय २० वर्ष, रा.बेनवडी, ता.कर्जत यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल शॉपी फोडल्याचे कबूल केले.त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी त्याच्या आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली.ते खडकी ता.करमाळा येथील आहेत. खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड, रा. खडकी, ता. करमाळा यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.वरील सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेले ४ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अमलदार सुनील माळशिखरे,भाऊसाहेब यमगर,विकास चंदन हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक,मनोज पाटील अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत,आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने,पोसई भगवान शिरसाठ,पोलीस अंमलदार अंकूश ढवळे,सुनिल माळशिखरे,पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमित बर्डे, गणेश भागडे, सागर म्हेत्रे, शकिल बेग, विकास चंदन, नितीन नरुटे यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे