लखनऊ,दि.०५:- लखनऊ परिसरातील असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक विचित्र प्रकार उघडकीस आला. अमरोहा येथून लग्नाची वरात घेऊन आलेल्या तरुणाने असमोली परिसरातील गावात एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.मात्र नवरदेवाची पहिली पत्नी अचानक तिथे आल्याने हा गोंधळ उडाली.
यानंतर मोठा गदारोळ झाला. काही वेळातच दोघांचा घटस्फोट झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. या प्रकरणी पोलिसांपर्यंतही पोहोचलं.
पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसली आणि पंचायतीच्या आदेशावरून अखेर हा अजब निर्णय घेण्यात आला. अमरोहा जिल्ह्यातील सैदगनली पोलीस स्टेशन हद्दीतील गावातला रहिवासी असलेल्या एका तरुणाचं चार वर्षांपूर्वी याच परिसरातील तरुणीसोबत लग्न झालं. पतीसोबत वाद झाल्यानंतर महिला आपल्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बुधवारी हा तरुण दुसऱ्या लग्नासाठी संभल जिल्ह्यातील असमोली परिसरात राहणाऱ्या एका गावात पोहोचला.लग्न नुकतंच पार पडलं, इतक्यात तिथे तरुणाची पहिली पत्नी आली. महिलेनं या लग्नाला विरोध करत गोंधळ घातला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. महिलेनं पोलीस ठाण्यात माहिती दिली.
यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले दुसरं लग्न करणाऱ्याला नवरदेवाला पोलीस ठाण्यात नेलं.पोलिसांची कारवाई पाहून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. पंचांनी फर्मान काढलं की त्या तरुणाने नुकतंच लग्न केलेल्या मुलीला घटस्फोट द्यायचा आणि तिचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावायचं. पंचायतीच्या निर्णयानंतर नवरदेवाने लग्नानंतर तासाभरातच नवरीला घटस्फोट दिला. त्यानंतर तरुणीचं नवरदेवाच्या लहान भावाशी लग्न झालं. निकाहच्या तासाभरात घटस्फोट आणि दुसरं लग्न हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.