पुणे दि.१६:- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.
‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.