नवी दिल्ली,दि.१९:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत बहुविध विकास उपक्रमांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या प्रकल्पांमध्ये, मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि 7 या मार्गांचे लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे आणि सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन आणि मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाची पायाभरणी यांचा समावेश आहे.
आजचे प्रकल्प हे मुंबईला एक उत्तम महानगर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे सांगून पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना लाभार्थी आणि मुंबईकरांचे अभिनंदन केले. “स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे” असे पंतप्रधान म्हणाले. भारतात जेव्हा केवळ गरिबीवर आणि जगाकडून मदत मिळवण्यासाठीच्या पर्यायांवर चर्चा होत असे त्या काळाचे स्मरण त्यांनी केले.
जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जसे विकसित भारताची आतुरतेने वाट पाहत आहेत, तसाच आशावाद भारताबाबत जगात दिसून येतो आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे, “आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे” “छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले.
आपला देश आणि करोडो नागरिकांचे नुकसान करणाऱ्या घोटाळ्यांच्या काळाची पंतप्रधानांनी आठवण काढली. “आपण ही विचारधारा बदलली आहे आणि आज भारत भविष्यवादी मनोधारणा तसेच आधुनिक दृष्टीकोनासह भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर पैसा खर्च करत आहे,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले की, गृहनिर्माण, शौचालये, वीज,पाणी, स्वयंपाकाचा गॅस, मोफत वैद्यकीय उपचार, वैद्यकीय महाविद्यालये, एम्स,आयआयटी आणि आयआयएम यांचा वेगाने विस्तार होत असताना दुसरीकडे आधुनिक संपर्क सुविधेला देखील मोठी चालना मिळत आहे. “आजच्या गरजा आणि उद्याच्या शक्यता अशा दोन्ही पातळ्यांवर काम सुरु आहे,” ते म्हणाले. सध्याच्या कठीण परिस्थितीत देखील भारत 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे तसेच पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले, “हे आजच्या भारताच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे आणि विकसित भारताच्या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे.”
विकसित भारताच्या उभारणीत शहरांकडे असलेल्या भूमिकेवर मोदी यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की अमृतकाळात, महाराष्ट्रातील अनेक शहरे भारताच्या विकासाला प्रेरणा देणार आहेत. “म्हणूनच मुंबई शहराला भविष्याच्या दृष्टीने सज्ज करणे हे दुहेरी इंजिन असलेल्या सरकारच्या महत्त्वाच्या प्राधान्याक्रमांपैकी एक आहे,” ते म्हणाले. मुंबईतील मेट्रो सेवेचे उदाहरण देत पंतप्रधान मोदी म्हणाले की वर्ष 2014 मध्ये मुंबईत 10-11 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होता. आता डबल इंजिन सरकारच्या प्रेरणेने मेट्रोच्या कामाला नवा वेग आणि प्रमाण प्राप्त झाले असून लवकरच मेट्रो रेल्वेचे 300 किलोमीटर लांबीचे जाळे उभारण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे विभागाच्या प्रगतीसाठी देशभरात मोहीम तत्वावर काम सुरु असून मुंबई मेट्रो आणि उपनगरी रेल्वे सेवांना देखील त्याचा लाभ होणार आहे अशी माहिती मोदी यांनी दिली. ज्या लोकांकडे विपुल साधनसंपत्ती आहे अशांच्या आवाक्यात असलेल्या आधुनिक सेवा, स्वच्छता यांनी युक्त अशा वेगवान प्रवासाचा अनुभव सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार प्रयत्नशील आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले की म्हणूनच, आजच्या काळात, विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे आणि या उपक्रमाचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या स्थानकाला नवा चेहेरा मिळवून देण्याचे काम सुरु होत असून एकविसाव्या शतकातील भारताचे झळाळते उदाहरण म्हणून या स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. “सर्वसामान्य लोकांसाठी अधिक उत्तम सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांना अत्यंत सुलभ प्रवासाचा अनुभव मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” पंतप्रधान म्हणाले. नव्याने विकसित रेल्वे स्थानक केवळ रेल्वे सेवांपुरते मर्यादित नसेल तर ते बहुपर्यायी जोडणीचे मोठे केंद्र म्हणून देखील काम करेल. “बस, मेट्रो,टॅक्सी, ऑटोरिक्षा असे वाहतुकीचे सर्व पर्याय आणि प्रवास करण्याचा प्रत्येक मार्ग येथे एका छताखाली उपलब्ध असेल. आणि यातून सर्व प्रवाशांना सुरळीत दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होतील,” पंतप्रधान म्हणाले. अशा प्रकारच्या बहुपर्यायी जोडणीची केंद्रे प्रत्येक शहरात विकसित करण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
आगामी काळात मुंबईच्या उपनगरी सेवेचं आधुनिकीकरण, मेट्रो जाळ्याचा विस्तार, वंदे भारत ट्रेन्स आणि बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगवान अत्याधुनिक संपर्कव्यवस्था यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
“गरीब मजूर आणि कर्मचाऱ्यांपासून दुकानदार आणि खूप मोठ्या व्यावसायिकांपर्यंत मुंबईत राहाणाऱ्या सर्वांनाच मोठी सोय उपलब्ध होणार आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. शेजारी जिल्ह्यांमधून आता मुंबईत प्रवास करणे देखील सोपे होणार आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. कोस्टल रोड, इंदू मिल स्मारक, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक यांसारखे प्रकल्प आणि अशाच प्रकारचे इतर प्रकल्प मुंबईला एक नवी शक्ती प्रदान करत आहेत, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. धारावी पुनर्विकास आणि जुन्या चाळींच्या विकासाचे प्रकल्प आता पुन्हा रुळावर येत आहेत असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले आणि या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. मुंबईतल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आज हाती घेतलेल्या कामाकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि अशा प्रकल्पामधून डबल इंजिन सरकारची वचनबद्धता दिसून येते असे सांगितले.
भारतीय शहरांचा कायापालट करण्यासाठी काम सुरू आहे, असं पंतप्रधान म्हणाले. प्रदूषण आणि स्वच्छता यांसारख्या व्यापक शहरी समस्यांवर तोडगे शोधले जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक वाहन वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, जैवइंधन आधारित परिवहन प्रणाली, हायड्रोजन इंधनावर मोहिमेच्या स्वरुपातील भर आणि नद्यांची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्रं ही या दिशेनं उचललेली काही पावलं आहेत
“शहरांच्या विकासासाठी क्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीचा कोणताही अभाव नाही. तरीही मुंबईसारख्या शहराचा विकास तेथील स्थानिक शहरी शासनसंस्थेमध्ये जलद विकासाची तितक्याच प्रमाणात निकड असल्याशिवाय होऊ शकणार नाही. त्यामुळेच मुंबईच्या विकासात स्थानिक शहरी शासन संस्थेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. या शहराला मिळत असलेल्या पैशाचा योग्य विनियोग होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकासावरून राजकारण करू नये, असा इशारा देखील त्यांनी दिला. परवडण्याजोग्या आणि तारणविरहित कर्जाचा 35 लाखांपेक्षा जास्त फेरीवाल्यांना लाभ देणाऱ्या आणि ज्या योजनेचा अगदी महाराष्ट्रात देखील 5 लाख लाभार्थी असलेल्या स्वनिधी योजनांसारख्या योजना राजकीय कारणामुळे ठप्प झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यासाठी त्यांनी सुयोग्य समन्वयावर भर दिला आणि केंद्र ते महाराष्ट्र ते मुंबई अशी ताळमेळ राखून काम करणाऱ्या प्रणालीची गरज व्यक्त केली. स्वनिधी ही एखाद्या कर्ज योजनेपेक्षाही बरीच काही आहे आणि ती फेरीवाल्यांच्या आत्मसन्मानाचा पाया आहे, असे सांगितले. यावेळी लाभार्थ्यांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांनी अतिशय कमी कालावधीत 50 हजार कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले आहेत. “जेव्हा ‘सबका प्रयास’ होतो तेव्हा काहीही अशक्य नसते याचे डिजिटल इंडिया हे जिवंत उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान रस्त्यावरील विक्रेत्यांना म्हणाले, “मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही दहा पावले टाकलीत, तर मी अकरा पावले टाकायला तयार आहे.” देशातील कष्टकरी जनता मोठा बदल घडवून आणणार असून त्यांच्या कामाने आणि समर्पणाने देश नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या विकासकामांसाठी त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि शिंदे जी -देवेंद्रजी यांची जोडी महाराष्ट्राची स्वप्ने साकार करेल अशी ग्वाही लोकांना दिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी मुंबईत सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नागरिकांना निर्वेध आणि गतिमान वाहतूक व्यवस्था प्रदान करणे, हे पंतप्रधानांनी स्वतः लक्ष केंद्रित केलेल्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक असून, त्या अनुषंगाने, त्यांनी सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2अ आणि 7 चे आज लोकार्पण केले. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (यलो लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2अ सुमारे 18.6 किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व (रेड लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. या मार्गांची पायाभरणीही पंतप्रधानांनी 2015 मध्ये केली होती.
पंतप्रधानांनी सुमारे 17,200 कोटी रुपये खर्चाच्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी केली. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 2,460 एमएलडी इतकी असेल.
मुंबईतील आरोग्य सेवेची पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधानांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या 20 शाखांचे उद्घाटन केले. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून, लोकांना आरोग्य तपासणी, औषधे, तपासणी आणि रोग निदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरवल्या जातात. मुंबईमध्ये भांडूप इथले 360 खाटांचे मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव पश्चिम इथले 306 खाटांचे सिद्धार्थ नगर रुग्णालय, आणि 152 खाटांचे ओशिवरा प्रसूतिगृह या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. शहरातल्या लाखो रहिवाशांना याचा लाभ मिळेल आणि त्यांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.
पंतप्रधानांनी मुंबईतल्या सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचाही शुभारंभ केला. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील सुमारे 2050 किलोमीटर लांबीच्या एकूण रस्त्यांपैकी 1200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण तरी झाले आहे, अथवा ते काँक्रिटीकरणाच्या प्रक्रियेत आहेत. तरीही, सुमारे 850 किमी लांबीच्या उर्वरित रस्त्यांवरील प्रवाशांना खड्ड्यांच्या आव्हानाचा सामना करावा लागतो, ज्याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम होतो. या आव्हानावर मात करणे, हे रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हे काँक्रीटचे रस्ते वाढीव सुरक्षेसह जलद प्रवास सुनिश्चित करतील, तसेच चांगल्या सांडपाणी सुविधा आणि बहुपयोगी नलिकांची सुविधा प्रदान केल्यामुळे रस्ते वारंवार खोदले जाणार नाहीत.
पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही केली. टर्मिनसच्या दक्षिणेकडील वारसा स्थळाच्या (हेरिटेज नोड) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, उत्तम मल्टीमोडल (बहूपर्यायी वाहतुकीचे) एकत्रीकरण आणि जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन करणे आणि त्याचे संवर्धन करणे, या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर, पंतप्रधानांनी पीएम स्वनिधी योजने अंतर्गत एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाची सुरुवातही केली.