मुंबई,दि.०२:- : राज्य शासनाची वेबसाईट बंद असल्याने सुमारे १५हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली असून त्यांचे महाविद्यालयीन प्रवेश मार्गी लावून त्यांना प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज (बुधवारी) विधानसभेत मांडली.
पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मे,जून,जुलै महिन्यांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू होते. या प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखले जसे की रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, इत्यादी काढण्यासाठी विद्यार्थ्यांना राज्याच्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. पण यावर्षी राज्याची वेबसाइट दि. २५ मे २०२५ ते 3 जून २०२५ पर्यंत बंद होती, परिणामी पुणे शहरातील १५हजार विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली गेली, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
मे, जून, जुलै महिन्यात जेव्हा दाखले काढण्याची वेळ येते तेंव्हा वेबसाईट बंद पडते आणि विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडते. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होतो. यासाठी राज्य शासनाने या वेबसाईटची तांत्रिक क्षमता वाढवणे गरजेचे असून विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली