पुणे ः वेगवान आणि आक्रमक खेळाला बचावाची सुरेख जोड देत मुंबई कस्टम संघाने रविवारी हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नेहरुनगर पिंरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी स्पोट्स ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघाचा 3-1 असा पराभव केला.
सामन्याला वेगवान सुरवात करताना मुंबई कस्टम संघाला साकिर हुसेन याने आठव्याच मिनिटाला आघाडीवर नेले. त्याने या वेळी मिळालेला पहिलाच पेनल्टी कॉर्नर यशस्वी केली. त्यानंतर त्यांनी वारंवार खोलवर चाली रचून सामन्यावर नियंत्रण ठेवले होते. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना ध्रुवील पटेल याने गुजरात संघाला बरोबरी साधून दिली.
अनुभवी राहुल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई कस्टम संघाने उत्तरार्धाची सुरवात देखील वेगवान केली. उत्तरार्धाच्या पहिल्याच म्हमजे सामन्याच्या 31व्या मिनिटाला इक्टेदार इश्रत याने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरच्या टप्प्यापर्यंत कायम राखली. त्यांच्या बचाव फळीने यात मोलाची कामगिरी बजावली. सामना संपण्यास सात मिनिटे असताना कर्णधार आणि स्पर्धेचा मानकरी जयेश जाधव याने गोल करून संघाचय विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात इन्कमटॅक्स, पुणे संघाने नितिन कुमार आणि आशिष छेत्री यांनी केलेल्या गोलच्या जोरावर मुंबई रिपब्लीकन्स संघाचा 2-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ऑलिंपियन धनराज पिल्ले याच्या हस्ते पार पडला. या वेळी हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सचिव मनोज भोरे, हुसेन नाबी स्पोर्टस फौंडेशनचे आश्रयदाते फिरोझ शेख, फौंडेशनचे उपाध्यक्ष विभाकर तेलोरे आदि उपस्थित होते.
———–
निकाल
अंतिम सामना
मुंबई कस्टम्स 3 (साकिर हुसेन 8, इक्तेदार इश्रत 31, जयेश जाधव 53वे मिनिट) वि. स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात 1 (ध्रुवील पटेल) मध्यंतर 1-1
तिसरा क्रमांक
इन्कमटॅक्स, पुणे 2 (नितिन कुमार 36, आशिष छेत्री 39वे मिनिट) वि. मुंबई रिपब्लीकन्स 0 मध्यंत 0-0
———–
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ः यश गोंडालिया (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात)
सर्वोत्कृष्ट बचावपटू ः अजितेश रॉय (इन्कमटॅक्स, पुणे)
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक ः वेंकटेश देवकर (मुंबई रिपब्लीकन्स)
सर्वोत्कृष्ट आक्रमक ः तालिब शेख (हॉकी पुणे)
स्पर्धेचा मानकरी ः जयेश जाधव (मुंबई कस्टम)
सर्वाधिक गोल ः आकाश सपकाळ (रेल्वे पोलिस बॉईज)
सर्वोत्कृष्ट खेळाडू ः आदित्य रसाळा (रोव्हर्स अकादमी अ)
सर्वोत्कृष्ट संघ ः मुंबई रिपब्लीकन्स
सर्वोत्कृष्ट खेळाडू (पंचांची निवड) ः इक्तेदार इश्रत (मुंबई कस्टम)