.बोरघर / माणगांव,दि,२७ :- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून माणगांव तालुक्यात सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळ आणि गोद नद्यांसह सर्व उप नद्यांना पूर आल्याने या सर्व नद्यांच्या पाण्याने संपूर्ण माणगांव तालुक्याला वेढा घातला आहे. त्यामुळे संपूर्ण माणगांव तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
माणगांव तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवस अहोरात्र पडणार्या मुसळधार पावसामुळे काळ, गोद, अंबा, वैतरणा इत्यादी नद्यांना पूर आल्याने या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सखल भागात नद्यांचे पाणी शिरले असून माणगांव शहरातील गटारे पाण्याने तुडुंब भरली आहेत
त्यामुळे गटारांची प्रदुषित पाणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आले आहे. त्याच बरोबर वरुन सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे माणगांव तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या मध्ये प्रामुख्याने माणगांव मोर्बा रोड, माणगांव निजामपूर रोड, नाणोरे, खरवली फाटा,इंदापूर विभाग, मुठवली,कालवण, ढालघर, पळसगांव, लोणेरे, मोर्बा, दहिवली, गोरेगांव विभाग पुर्ण पणे जलमय झाला असून तालुक्यातील अनेक ठिकाणच्या पुलावरुन, रस्त्यावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रहदारी बंद झाली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील एकंदरीत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
माणगांव तालुक्यातील सद्य परिस्थिती बाबत माणगांव तहसीलदार आयर्लंड मॅडम आणि माणगांव पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगोले यांच्याशी संपर्क साधून सदर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापना विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की… आम्ही माणगांव पोलीस आणि प्रशासनाच्या माध्यमातून तालुक्यातील पूर सदृश्य स्थितीची पाहणी करून माणगांव बस स्थानकात, माणगांव मोर्बा रोड, निजामपूर रोड, बामणोली रोड, एसएस निकम स्कूल, इंदापूर विभाग, गोद नदी, काळ नदी आणि ताम्हिणी घाट, देवकुंड इत्यादी संवेदनशील ठिकाणी सुरक्षात्मक दृष्टीकोनातून सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत त्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्ती वा पूर सदृश्य स्थितीचा सामना करण्यासाठी तथा व्यवस्थापन व निवारण करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे असे दोन्ही प्रशासकीय अधिकारी म्हणाले.
.( छाया : पत्रकार विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )