मुंबई, दि. २५ : -राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे सुरु असून तूरविक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये. तूर साठवण्यासाठी पुरेशा गोणी उपलब्ध ठेवाव्यात. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडची संपूर्ण तूर खरेदी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तूरखरेदीसाठी आवश्यक असलेली २०० कोटी रुपयांची हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा त्यास मान्यता देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात आयोजित बैठकीत राज्यातूल तूर उत्पादन आणि तूरखरेदीचा आढावा घेण्यात आला. कृषीमंत्री दादासाहेब भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदींसह कृषी, पणन, भारतीय अन्न महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. तूरखरेदीसाठी सोयाबीनसोबत आंतरपिक घेतलेल्या तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरुन उत्पादकता निश्चित करण्यात येणार आहे व त्यानुसार खरेदी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यंदा राज्यात ३ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत खरेदी सुरु झाली आहे. यंदा २ लाख २४ हाजर ३८५ मेट्रिक टन तूरखरेदीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.