मुंबई दि २५ :- अजित पवार (उपमुख्यमंत्री) यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपाचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि काँग्रेसचे सुधीर तांबे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहतील.
एकूण महाराष्ट्रातील ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत सद्यस्थितीत भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य, काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी १३ आणि इतर सदस्यांचा समावेश आहे.
एक नजर त्यांच्या राजकिय कारकिर्दीवर
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (काँग्रस + राष्ट्रवादी काँग्रॆस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
मुुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत