पिंपरी चिंचवड,दि.१० :- पुण्यातील दुकानदारांना खोटे स्क्रीनशॉर्ट दाखवून ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ओहेगाव येथून एकाला अटक केली आहे. एका दुकानदाराने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश शंकर बोरसे (वय ३४) या आरोपीला अटक केली असून या गुन्ह्यात त्याची पत्नी देखील सामील असल्याचे समोर आले आहे.
सविस्तर माहिती अशी, की आरोपी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी बनावट अॅप्लिकेशन वापरत होते. दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून स्क्रीनशॉट दाखवत असत.
दुकानदारांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास आरोपी त्यांचा मोबाईल नंबर दुकानदाराला देत आणि निघून जात. काही वेळाने या नंबरवर कॉल केला असता हा नंबर स्विच ऑफ दाखवत आसे.
अशा प्रकारे आरोपी व त्याच्या पत्नीने गेल्या काही महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ३०० हून अधिक दुकानदारांची फसवणूक केली होती. या दरम्यान एका दुकान मालकाच्या लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे वायफाय कनेक्शन शोधून काढले. ज्याचा वापर पीडितांना फसवण्यासाठी मोबाईल क्रमांकासह केला गेला होता.