पुणे,दि.१४ :- पोलिसांसाठी कल्याण योजना राबविता याव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने पाषाण रोड व बाणेर रोड चव्हाण नगर येथे दोन पेट्रोल पंप सुरु केले. तेथे काम करणार्या कर्मचार्यांनी त्यांच्याकडे जमा झालेले पैसे न भरता तब्बल २० लाख १९ हजार ६१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या ५६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या चव्हाण नगर मुख्यालयातील पोलीस कल्याण शाखेचे राजेश घायाळ यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमला जेम्य, सुनिता ननावरे, सुरज पाथरे, रेवती पाटील, अक्षय जगताप, आनंता चांदणे व इतर ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कल्याण शाखेअंतर्गत पाषाण रोड व बाणेर रोड येथे दोन पेट्रोल पंप उभारण्यात आले आहेत. येथे खासगी कंपनीमार्फत कर्मचारी भरले जातात. या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार्या कर्मचारी यांच्याकडे ग्राहक पेट्रोल भरल्यानंतर रोखीने पैसे जमा करत. त्यापैकी काही रक्कम हे कर्मचारी जमा करीत नसत. या पेट्रोल पंपाचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यात लेखा परिक्षक शेख भगरे यांनी अहवाल दिला. त्यात बाणेर रोडवरील चव्हाण नगर येथील पेट्रोल पंपावर १० लाख २५ हजार ३२४ रुपये तसेच पाषाण रोड पेट्रोल पंपावर २ लाख ९३ हजार ७३६ रुपये असा एकूण २० लाख १९ हजार ६१ रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस करीत आहे