पुणे,दि.२९:-पुणे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक 28 तासांच्या आत संपली. शेवटच्या उंबऱ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाने ही मिरवणूक संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. 28 तासांच्या आत गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचं पाहायला मिळालं. मानाचे गणपती, दगडूशेठ गणपती यांचं वेळेत विसर्जन पार पडलं. व लवकर मिरवणूक संपवण्याचा दावा मात्र फोल ठरला.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी यावर्षी पुणे पोलिस आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले. मात्र, त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. कारण दगडूशेठ नंतर या मंडळांएवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरुच झाली नाही.
सर्वांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक लवकर आणि शांततेत पार पडली. साधारण 2905 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पुढील वर्षी अजून विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करता येईल, दगडूशेठ गणपती मंडळाने 4 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. असं पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
अनंत चतुर्दशीला सकाळी 10 वाजला मिरवणुकीला सुरुवात झाली होती. दिवसभर पुण्यातील मध्यवर्ती भागात मिरवणुकीचा जल्लोष बघायला मिळाला. सगळ्या रस्त्यांवर मिरवणुकीची धामधुम बघायला मिळाली. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारात मानाच्या पाचही गणपतीचं प्रथेप्रमाणे विसर्जन करण्यात आलं.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा पहिल्यांदाच 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी नियोजन केलं होतं. दरवर्षी दगडूशेठ गणपतीमुळे विसर्जन मिरवणूक लांबते असं बोललं जातं होतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात केली आणि भर पावसात, जल्लोषात रात्री पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले.
रात्री १२ वाजता बंद झालेले ध्वनीक्षेपक शुक्रवारी सकाळी बरोबर ६ वाजता सुरू झाले. त्यानंतर पून्हा एकदा लक्ष्मी रस्ता डीजेच्या दणदणाटात घुमू लागला. पोलिसांनी विनंती करूनही मंडळांचे पदाधिकारी खेळ दाखवल्याशिवाय पुढे जायला तयार नव्हते. अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश अलका चौक पार झाल्यावर भाविकांच्या गर्दीचा पूर एकदम ओसरला. कार्यकर्त्यांची गर्दी मात्र कायम होती.
सकाळपासून लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यावरून मिरवणुका सुरु. सर्वत्र मोठे मोठे डीजे लावल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून मंडळांना लवकरात लवकर पुढे जाण्याचे आवाहनही केले जात आहे. परंतु मंडळांची संख्या जास्त असल्याने ते शक्य होत नाहीये. तसेच मंडळातील कार्यकर्तेही मिरवणूक पुढे घेऊन जाण्यास विलंब करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. यंदाही मागच्या वर्षीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.