पुणे,दि.१२ :- पुणे शहरातील कोथरुड परिसरातील एका बांधकाम कंपनीच्या कार्यालयात अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीला मोबाईलवर फोन करुन सायबर चोरट्यांनी 66 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना बिहार राज्यातून अटक केली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी एकाला बिहार मधून अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर फोन व मेसेज केले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना कंपनीचे संचालक बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांना कंपनीच्या अकाऊंटमधून असे एकूण 66 लाख 41 हजार 522 रुपये पाठवण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. गुन्हा करताना वापरलेले मोबाईल व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. तसेच एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील इजमाली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने सिवान येथे जाऊन फिर्यादी यांना संपर्क करुन फसवणूक करणाऱ्या टोळीतील बेलाल अन्सारी व कामरान अन्सारी यांना ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयत हजर केले असता त्यांना 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून विविध मोबाईल कंपन्यांचे 36 सिम कार्ड, 8 मोबाईल फोन, विविध बँकांचे 19 एटीएम कार्ड व 2 चेकबुक, 1 गावठी कट्टा व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करीत आहेत.
पुणे शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वर नमूद मोबाईल क्रमांकाचा वापर करुन कोणाची फसवणुक
झाली असेल तर अशा नागरिकांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात संपर्क करावा.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त श्रीनीवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत ,
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात , सहायक पोलीस उपनिरीक्षक संदेश कर्णे,पोलीस अंमलदार दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रविणसिंग राजपुत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे,राजेश केदारी, योगेश व्हावळ यांच्या पथकाने केली.