पुणे ग्रामीण,दि.०३: मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना पुण्यातील पवनानगर जवळील प्रभाचीवाडी, महागाव येथे 31 ऑक्टोबर च्या रात्री घडली होती.
एक नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र टीम तयार करत आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 30 तासात या घटनेतील मुख्य आरोपी व त्याचे इतर सहकारी अशा तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.
निलेश दत्तात्रय कडू (वय 32 वर्ष, राहणार सावंतवाडी पवनानगर, मावळ) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी व मयत हे दोघेही मित्र आहेत. कामशेत व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये ते एकमेकांचे सहकारी आहेत. त्यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाले होते. या वादामधून सदरचा खून झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय घायाळ राहणार पवनानगर याला पोलिसांनी तळेगाव येथून ताब्यात घेतले आहे तर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या अन्य दोन सहकारी यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी प्रभाची वाडी या ठिकाणी मयत व आरोपी हे चौघेजण नशा पान करण्यासाठी बसले होते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर अज्ञात हत्याराने निलेश याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले व नंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, विजया म्हात्रे व ९ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या घटनेचा तपास करत उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.