पुणे, दि. १७ :- ऑक्टोबर: जागतिक स्तरावर शांतता निर्माण व्हावी हा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांवर बालवयातच शांतीचे संस्कार व्हावेत यासाठी लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी पीस पोस्टर स्पर्धा घेतली जाते. सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक शांततेचे बद्दलची आपली कल्पना चित्राद्वारे मांडायचे असते. यावर्षी “सेवेतून शांती” या विषयावर चित्र काढायची होती. ११ ते १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी स्पर्धा ऑनलाईन घेतल्या गेल्या. २५ लायन्स क्लबअंतर्गत येणा-या तब्बल ६५ शाळा आणि ४५०० विध्यार्थ्यांचा सहभाग होता.
हुजूरपागा हायस्कूलची विद्यार्थिनी आर्या विजय शिंदे हि या स्पर्धेत प्रमथ आली तर झोया समीर टेमरीकर, अनमोल तुकाराम पवार, पूजा जेठाराम चौधरी, वैष्णवी राजेंद्र दोडेकर, अयान अब्दुल कादर र्शिडगीकर, साई प्रेम वैद्य, रिधम रोहीत संचेती, अवनी मंदार धुमाळ, गौरी अनुज ताथेड, आदिती प्रकाश हघरमाळकर हे सर्व विद्यार्थी प्रथम 10 क्रमांकामध्ये आलेले आहेत.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कर्वेरोड येथील अश्वमेघ हॉल येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमप्रमुख सीमा दाबके यांनी केले सुत्रसंचलन पल्लवी देशमुख तर दिपाली ठाकर यांनी आभार मानले. यावेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, प्रांतपाल अभय शास्त्री, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सुनीता चिटणीस, रवी गोलार, ज्योतिबा उबाळे, राणी अहलुवालिया, प्रिती परांजपे यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षक म्हणून मिलिंद फडके व सुधाकर चव्हाण यांनी काम पाहिले.
प्रांतपाल अभय शास्त्री म्हणाले, लायन्स क्लब तर्फे यावर्षी भारत @१०० हा उपक्रम संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मुलांनी २०४७ मधील माझ्या स्वप्नातील भारत कसा अपेक्षित आहे तसेच तो तसा घडण्यासाठी माझे काय योगदान असेल हे नमूद करणारा एक मिनिटांचा व्हिडिओ पाठवायचा आहे. या उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी शास्त्री यांनी केले. कोणत्याही प्रकारच्या ताणतणावामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ‘मन:शांती’. तरुणांच्या मनातील शांततेच्या विषयी असणा-या भावना त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून समाजासमोर याव्यात या उद्देशाने ‘सेवेतून शांती’ हा विषय घेऊन स्पर्धा घेण्यात आल्याचे लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल अभय शास्त्री म्हणाले.
नरेंद्र भंडारी म्हणाले, मुलांनी कोणत्या परिस्थितीतून ही चित्रे रेखाटली असतात हे तिराईत व्यक्तीला माहीत नसतं. त्यामुळे खरंतर मुलांनी रेखाटलेली चित्रे पालकांना निरिक्षणाला दिली पाहिजेत. म्हणजे त्यातून मुलांचे शांततेच्या विषयीचे विचार पालकांपर्यंत पोहचतील. आज आपण या रेखाटलेल्या चित्रांतून सर्व जगाला एक संदेश देतोय की सेवाकार्यातूनही जगात शांतता नांदु शकते. ‘सेवेतून शांती’ या विषयावर चित्र काढताना, मुलांना खूप शिकायला मिळाले आहे असे वाटते. मुलांनी शांतता हा विषय खूप आत्मसात करण्याचा आहे. स्वतः रेखाटलेले चित्र नीट अभ्यासा म्हणजे त्यातून तुम्हाला ती शांतता अनुभवता येईल, जी भविष्यात त्यांना उपयोगी पडेल.