पुणे,दि.16: मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधी नगर येथील मेट्रो प्रकल्प-1, 2 व 3 मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाबाबत आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महामेट्रोचे डॉ. रामनाथ उपस्थित होते.
यावेळी झोपडपट्टी धारकांच्यावतीने स्थानिक पदाधिकारी, प्रतिनिधींनी बाधित झोपडपट्टी धारकांचे म्हणणे मांडून सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बाधित झोपडीधारकांच्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मेट्रोने उपलब्ध करुन देण्याचा व त्यानुसार त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. तसेच यादृष्टीने आतापासूनच प्रशिक्षण देण्यात यावे. बाधित झोपडीधारकांना दोन्ही मेट्रो मार्गाचे आराखडे दाखवून पुनर्वसनाबाबत जागांच्या शक्यता पडताळाव्यात. तसेच अन्य ठिकाणी स्थलांतर केल्यास त्यांना पीएमपीएमएल चा पास मिळवून देता येईल का, याचाही विचार करावा, असे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर व संबंधित अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्प व झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.
झोपडपट्टी धारकांच्या वतीने स्थानिक पदाधिकारी, प्रतिनिधींनी पुनर्वसनाबाबत सूचना केल्या.