पुणे-दि १७ : कोरोनाच्या काळात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, ज्येष्ठ पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती, ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, ‘जागृती ग्रुप’चे राज देशमुख, किरण साळी, प्रा. अक्षीत कुशल, प्रा. रामचंद्रन आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तथापि, 26 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत अचूक आणि तात्काळ पोहोचवण्यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्यात येत होती. त्यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्यास मदत झाली. याबाबींची दखल घेवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी राजेंद्र सरग यांना विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017 चा आद्य पत्रकार देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र पोलीस दलाच्या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2004 पासून सन 2007 पर्यंत सलग 4 वर्षे प्रथम पुरस्कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्थेचा सन 2007 चा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, दक्षतातर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2008 मध्ये द्वितीय पुरस्कार, दैनिक रत्नभूमी, रत्नगिरी तर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2008 मध्ये प्रथम पुरस्कार, रोटरी क्लब, बीड तर्फे सन 2003 चा व्यवसाय गौरव पुरस्कार, दैनिक गांवकरी, औरंगाबादतर्फे व्यंगचित्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन 2004 मध्ये गौरव पुरस्कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्यस्तरीय चौथा स्तंभ व्यंगचित्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परभणी येथील जनसहयोग संस्थेच्यावतीने साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2012 चा ‘जननायक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
आकाशवाणी मुंबईच्या वतीने सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल 2017 मध्ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी 2017 मध्ये आयोजित अखिल भारतीय व्यंगचित्र स्पर्धेत रेखाटलेल्या व्यंगचित्रास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्या प्रबोधनपर व्यंगचित्र प्रदर्शनात राजेंद्र सरग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विविध दिवाळी अंकांत त्यांची 11 हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.