पुणे, दि. 6- पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज फलटणमार्गे जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एम.जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रारंभी पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणातील पाणी परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर पथकाने कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या भागातील शिवाराची पहाणी केली. एम.जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांनी शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिशय आपुलकीने शेतकऱ्यांची संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा दिला. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना चारा-पाणी या संदर्भात जिल्हा प्रशासन तात्काळ कार्यवाही करेल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती, पाण्याचा साठा, टंचाईमुळे उद्भवणारी परिस्थिती याशिवाय पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल केंद्रीय पथकाला सादर करण्यात आला. कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या परिसरातील स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, महिला यांनी, पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. iपहाणीच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर जोशी, उपायुक्त प्रताप जाधव, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, संजय आसवले, विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, पुरंदरचे तहसिलदार अतुल मेहेत्रे, गटविकास अधिकारी मिलींद टोणपे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर जेजुरी येथे पथक प्रमुख व केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित अधिकारी आणि पथकातील सदस्यांशी चर्चा केली