पुणे, दि :- ७ सैनिक सीमेवर खडा पहारा देत असतात, म्हणून आपण सुरक्षित असतो, या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन करत आपण सर्व सैनिकांविषयी कटीबध्द असायला हवे, असे प्रतिपादन सैनिक कल्याण विभागाचे प्रभारी संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभात ते बोलत होते. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, कर्नल शिंदे, कर्नल गोरे, कर्नल नाईकवडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद देवदत्त तुंगार आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, सीमेवर डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणारा सैनिक सेवानिवृत्ती नंतर नागरी जीवन जगत असतो, अशावेळी त्याला विविध प्रश्नांबाबत अडचणी येऊ शकतात, त्या निवारण करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. सैनिकांविषयी असलेले ऋण व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असतो. सैनिकांच्या मुलांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास होण्यासाठी क्षमता बांधणी उपक्रम हाती घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली. माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मासिक बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे यांनी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्यावतीने (मेस्को) राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. प्रत्येक सैनिक हा शेतकरी असतो. सेवानिवृत्तीनंतर अनेक जण शेतीव्यवसाय करत असतात. त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी मेस्कोच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद देवदत्त तुंगार यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध विभागांनी ध्वजदिननिधीसाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात गतवर्षी ध्वजदिननिधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था,कार्यालयांच्या प्रमुखांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या शिवाय माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांना गौरव पुरस्कार प्रीत्यर्थ धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वाघमारे यांनी केले. यावेळी माजी सैनिक, पाल्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते