पुणे,दि.28:- जिल्हयातील पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात जनसमुदाय येत असतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सेवा-सुविधा देण्याबरोबच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
पेरणे येथील विजयस्तंभास 1 जानेवारी,2019 रोजी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या नियोजनाचा व केलेल्या कामांचा आढावा, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना, पालकमंत्री गिरीश बापट यांनी विजयस्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पाडावा असे सांगितले. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजयस्तंभ ठिकाणापर्यत प्रवासासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता व प्रकाश व्यवस्था, स्टॉलची मांडणी, अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त याचा आढावा घेऊन, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचाशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल सर्व संबधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल असे सांगितले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, अशी सूचना केली.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.