श्रीगोंदा दि १६ :- बालकामगार या अनिष्ठ प्रथेतुन महाराष्ट्र राज्य मुक्त करण्याच्या दृष्टीने कृतीदलामार्फत बालकामगार धाडसत्राचे आयोजन केले होते. या धाडसत्रामध्ये यास्मीन.अ.शेख, सरकारी कामगार अधिकारी,अहमदनगर, चाईल्डलाईन प्रतिनिधी महेश सूर्यवंशी,शाहीद शेख यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी शिवारात छापा टाकून सहा बालकामगारांची सुटका केली.यावेळी श्रीगोंदा स्टेशनचे पोलिस कर्मचारी गोकुळ दादासाहेब इंगवले, संतोष मारुती जगताप,होमगार्ड हे हजर होते.या बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणाऱ्या गुळ उद्योग चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याची कारवाई केली.सविस्तर वृत्त असे कि,तालुक्यातील वांगदरी येथील डोमाळवाडी परिसरात अनिष गुळ उद्योग नावाने चालू असलेल्या आस्थापनेवर अल्पवयीन मजूर काम करत असलेबाबत महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती.त्यानुसार अनिष गुळ उद्योग आस्थापनेला भेट दिली. याठिकाणी बाप्पू ज्ञानदेव महारणुर यांच्या उद्योगामध्ये सहा अल्पवयीन मुलं सर्व राहणार बोरसल, ता. नेपानगर,जि. बुऱ्हानपूर (मध्य प्रदेश) हे आढळून आले.याबाबत धाडसत्रातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून चौकशी केली असता, या अल्पवयीन मुलांनी आम्ही स्वच्छेने काम करत असलेबबाबत सांगितले. तसेच, राहत असलेल्या नातेवाईकांसह संबंधित मालकाकडे नमूद किशोरवयीन कामगारांचे वयाचे पुरावे मागितले असता, कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी व स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधीनीं एकत्रित निर्णय घेऊन या सर्व किशोरवयीन मुलांना अध्यक्ष बालकल्याण समिती अहमदनगर येथे दाखल केले.अध्यक्ष व बालकल्याण समिती अहमदनगर यांनी दिलेल्या आदेशानुसार अधीक्षक ‘डिस्ट्रिक्ट प्रोफेशन अंड आफ्टर्केअर असोसिएशन’ संचलित निराधार बालगृह अहमदनगर येथे नमूद सहाही बालकांना दाखल करण्यात आले. यानंतर कामगारांची जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे या बालकांच्या वयाबाबत चाचणी केली असता, सहा जणांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याचे अहवाल मिळाले.
यावरून नमूद कामगारांना किशोरवयीन असतांनाही कामावर ठेवले. म्हणून, बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ३ चे उल्लंघन केल्याने बापू नामदेव महारनूर डोंबाळवाडी, श्रीगोंदा याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष बालकल्याण समिती अहमदनगर यांनी दिलेल्या आदेशान्वये नमूद ६ बालकांना निराधार बालगृह अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे